छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुरंगी राजकीय चित्र पाहायला मिळाले आहे.
भाजपने ७, शिवसेनेने ६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ४ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गाढेजळगाव गणातील उमेदवार गयाबाई शंकरराव ठोंबरे यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवत विजयाचा चौकार लगावला आहे. गाढेजळगाव गणात ठोंबरे यांना ४ हजार २२५ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी वैशाली ठोंबरे यांचा ४७५ मतांनी पराभव करत पुन्हा एकदा आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले.
या गणात डॉ. दीपाली अमर देशमुख, छाया किड़ने, भाग्यश्री कोरडे व संगीता भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला. गोलटगाव गणातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुष्पाबाई अंकुश साळुंके विजयी झाल्या त्यांच्या रूपाने प्रहारने प्रथमच पंचायत समितीत प्रवेश केला. रुक्मिणी खलये, यमुनाबाई घोंगडे यांचा पराभव केला. करमाड गणात करमाडच्या गीता कोरडे यांनी भाजपच्या जिजा कोरडे यांना धूळ चारली, वरूड काझी गणात भाजपने शेखर दांडगे यांनी काँग्रेसचे भास्कर मुरमे यांचा पराभव केला.
पळशी गणातून निर्मला पळसकर, सावंगी गणातून सुमन चव्हाण, तर दौलताबाद गणातून भाजपचे सर्जेराव चव्हाण विजयी झाले. एकूणच पंचायत समित्ती निवडणुकीत पारंपरिक पक्षांसह नव्या समीकरणांची नोंद दिसून आली आहे. काही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव निर्णायक ठरल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.









